नमस्कार..!
@ShailendraOjha यांनी सुरु केलेल्या Architecture-of-Temples चॅलेंज साठी ही अजून एक एन्ट्री :
अंबरनाथ रेल्वे स्टेशन पासून अवघ्या २ किलोमीटर वर असलेले हे मंदिर, स्टेशन पासून चालत अथवा ऑटो ने सुद्धा इथे पोहोचू शकतो. निरव शांतता, पाखरांचा किलबिलाट यांनी मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलते.
हे मंदिर इसवी सन १०६० मध्ये शिलाहार राजवटीतील चित्तराज यांनी बांधले आणि त्यांच्या पुत्र मुम्मुनी यांनी मंदिराची पुनः बांधणी केली. मात्र लोककथेनुसार, पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर उभारले, अशी समजूत आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच मंदिरांच्या निर्माणात पांडवांचे नाव जोडले जाते, यावर तुमचे काय मत आहे?
हे मंदिर हेमाडपंथी आणि वेसार शैलीचं सुंदर उदाहरण आहे. काळ्या बेसाल्ट दगडात मंदिराचे पूर्ण बांधकाम तसेच मंदिरावर कोरलेली देवतांची शिल्पं आहेत. गर्भगृहात प्रवेश कारणासाठी काही पायऱ्या उतरून जावे लागते, मंदिरात नंदीची दोन शिल्प आहेत. गर्भगृहात दोन शिवलिंगं असून मुख्य लिंग स्वयंभू मानलं जातं.
मंदिराच्या बाहेरील भिंतींवर शिव, पार्वती, गणेश, कार्तिकेय, चंडिका यांची अप्रतिम कोरलेली शिल्पं असून, एक अद्वितीय शिल्प हरिहर-पितामह-सूर्य (शिव, विष्णू, ब्रह्मा आणि सूर्य एका मूर्तीत) इथे आढळतं. मार्कंडेय चे कोरलेलं एक शिल्प शोधण्याचा मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण अजून तरी ते मला सापडले नाही.
विशेषतः जेव्हा काळ्या कातळावर पावसाचे पाणी पडते, तेव्हा हे मंदिर एक जिवंत शिल्प वाटू लागतं. निसर्ग आणि वास्तुकलेचा हा संगम मंत्रमुग्ध करतो.
हे मंदिर युनेस्कोच्या संरक्षित वारसा स्थळांपैकी एक असून, भारतातील २५ आणि महाराष्ट्रातील ४ सांस्कृतिक वारशांमध्ये याचा समावेश आहे.
मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ ठेवलाय, फोटो काढायला काही भागात मनाई आहे, एक गरम पाण्याचे कुंड आहे, त्यात बरेच कासव दिसतात. तसेच एक भूमिगत गुहा आहे आणि ती पंचवटीपर्यंत जाते असे हि म्हणतात, मी अजून नाही पहिली. इतिहासप्रेमी, पुरातत्ववेत्ते आणि पर्यटकांसाठी हे मंदिर नेहमीच आकर्षण ठरते.
महाशिवरात्रीच्या वेळी ३–४ दिवस मोठी जत्रा भरते, जिथे हजारो भक्त भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात., तसेच श्रावण महिन्यात मंदिर पुन्हा भक्तांनी फुलून जातं. मंदिरात मंत्रोच्चार आणि शिवभक्तांचा ओघ अविरत असतो.
अंबरेश्वर शिवमंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर इतिहास, वास्तुकला, पौराणिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचं सजीव प्रतीक आहे. या मंदिराची शांतता, त्यातील शिल्पकामातील बारकावे, आणि शिवलिंगाच्या परिसरात पसरलेली उर्जात्मकता मनाला खोलवर भिडते.
या मंदिराला नक्की भेट द्याच , आणि अनुभव घ्या त्या शिवमय शिल्प सौंदर्याचा, ज्याला काळही झिजवू शकला नाही!
तुम्हाला या छायाचित्रांमध्ये ब्रह्मदेव आणि नटराज चे शिल्प दिसले का कंमेंट मध्ये नक्की सांगा
मंदिराची वेळ : सकाळी ५ ते रात्री ९
आरतीची वेळ : सकाळी ५.३० वाजता, संध्याकाळी : ८:०० वाजता
पायऱ्या : २०-२५
पूजेचे सामान : मंदिराच्या परिसरात दुकाने उपलब्ध आहेत
जेवण/पाणी : मंदिराजवळ जेवणासाठी काही नाही, अंबरनाथ स्टेशन जवळ हॉटेल आहेत. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे.
पार्किंग : पे अँड पार्क (Not Sure)
कसे पोहोचाल? : अंबरनाथ रेल्वे स्थानक (पूर्व) पासून मंदिर २ किमी अंतरावर आहे
जवळपासची मंदिरे : हेरंब मंदिर
#UNESCOHeritage #Maharahtra #HistoricalTemples #ShivaTemples #IndianArchitecture #Temples**