कराडमधील शिवकालीन श्री पावकेश्वर मंदिर
मंदिर मूळचे आहे 13 व्या शतकातले
श्रीनिवास वारुंजीकर, सातारा
कृष्णा-कोयनेच्या परमपवित्र अशा तीरावर वसलेल्या मौजे सैदापूर गावातील श्री पावकेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार तातडीने होणे गरजेचे असून, वेळेत हा जिर्णोद्धार न केल्यास गर्भगृहाच्या कललेल्या भिंती कोसळू शकतात. मूळचे 13 व्या शतकातील असलेले आणि शिवकाळामध्ये नावारुपाला आलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सैदापूर ग्रामस्थ आणि देवस्थान समिती प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने लोकप्रतिनिधी अथवा पुरातत्त्व विभागाने या मंदिराचे जुने सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अल्पसा इतिहास…
17 व्या शतकात छत्रपती शाहू महाराज (सातारा) म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव यांच्याकडून इनाम मिळाल्याचे म्हटले जाते तसेच कराड प्रांताचे असणारे पंतप्रतिनिधी घराण्याचे हे श्रद्धास्थान होते. त्यांनी इथं दिवाबत्तीची सोय केली होती. मंदिराचा परिसर हा 20 गुंठे एवढे क्षेत्रफळ आहे. 17 व्या शतकापर्यंत या गावाला शिवापूर म्हणूनच ओळख जायचं नंतर आदिलशाह च्या आक्रमणाने कराड भागातील बऱ्याच गावांची नावे ही बदलेली होती त्यावेळी शिवापूरची ओळख पुसून सय्यदपूर करण्यात आले होते.
त्यानंतर अपभ्रंश होत सैदापूर झाला. याच गावच्या पवित्र भूमीत कृष्णामाईच्या तीरावर पुर्वाभिमुखी असे पावकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
काय आहे मंदिरात…
मंदिरासंदर्भात वैभव साळुंखे यांनी माहिती दिली. पावकेश्वर मंदिराचे बांधकाम हे साधारण सतराव्या शतकात झालेले असून मंदिरावर अनेक दुर्मिळ शिल्पकलेने बांधणी केलेले आहे. या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य असे की, शिवलिंगावर ओतलेल पाणी (अभिषेक पाणी) हे बहुतांश मंदिरांमध्ये गोमुखातून बाहेर जाते. पण श्री पावकेश्वराच्या ठिकाणी मात्र अपवाद आहे. इथं गोमुखाऐवजी मकरमुखातून (मगरीचे तोंड)बाहेर जाते. मगर ही गंगेची कन्या मानली जाते. अशा पवित्र गंगेच्या मुखातून पवित्र असे गंगाजल मिळावे असा समज असे. हे शिल्प फार कमी मंदिरात पहावयास मिळते. साधारण असे 13 व्या शतकातील मंदिरावर असे शिल्प दिसून येतात.
मंदिराच्या आवारात एक प्राचीन विहीर होती परंतु ती कालांतराने मूजविण्यात आली पण त्या विहिरीचे अजूनही चौथेरे दिसून येतात. एकूणच श्री पावकेश्वराचे मंदिर प्राचीन व पवित्र असे शिवलिंग मंदिर आहे. मंदिरास दोन दरवाजे असून एक दरवाजा पूर्वेला आणि दुसरा दरवाजा उत्तरेस आहे. पूर्वेच्या दरवाजा बाहेर उंच अशी एक दीपमाळ आहे. ही दीपमाळ 13 व्या शतकातील असावी. मंदिराचा परिसर पूर्णपणे तटबंदी वजा शैलीमध्ये बंदिस्त आहे. तटाच्या आतील उत्तर बाजूस राहण्यासाठीची सोय दिसते. परकीय आक्रमणाच्या काळात या मंदिरावर अनेकदा हल्ले झाले. तशा खुणा स्पष्टच मंदिरावर दिसून येतात.
मंदिराच्या समोरील नंदी आणि त्याची एकूण रचना पहाता हा नंदी प्राचीन असल्याचे साक्ष देतो. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात शिवलिंग आहे.
या शिवलिंगाची आकारावरून हे शिवलिंग 13 व्या शतकातील असावे असे सांगता येते. मंदिराच्या आतील बाजूची रचना पाहिल्यास पूर्णपणे दगडी जोत्यावर एकावर एक अशाप्रकारे रचून हे मंदिर बांधण्यात आले. बेलपत्र, शरभशिल्प, गजमुख, कीर्तीमुख, मकरमुख, कमळपुष्प, वेलीबुटी या सारखे रचनात्मक शिल्पवैशिष्ट्ये येथे ठळकपणे दिसून येतात. मंदिराचा शिखराचा भाग हा नंतरच्या काळातील म्हणजे शिवकाळात पुन्हा बांधला असावा, असे मानायला जागा आहे.
कराड पंचक्रोशीत 12 ज्योतिर्लिग आहेत
- संगमेश्वर अर्थात गरूडतीर्थ - प्रितीसंगमजवळ
- कमळेश्वर - मंगळवार पेठेतील करडे पीराजवळ
- गोळेश्वर - गोळेश्वर गाव
- कपिलेश्वर - कापिल गाव
- निळकंठेश्वर - आगाशिव डोंगराव
- वरूणेश्वर - वारुंजी गाव
- धर्मेश्वर - वनवासमाची
- कोटेश्वर - खोडशी गाव
- निळेश्वर - वडोली निळेश्वर गाव
- आनंदेश्वर - गोटे गाव
- हटकेश्वर - कराड
- रत्नेश्वर - कृष्णाकाठी भटांच्या बागेत
त्यापैकी श्री पावकेश्वर हे सर्वात प्राचीन मंदिर होय.
जायचे कसे?
पुणे-मुंबईहून 165 किमी दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर कराड हे सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. कराड शहरातून मसूर गावाकडे जाताना नगर परिषदेच्या हद्दीला लागून विद्यानगर अर्थात सैदापूर गाव आहे. कराडपासून सैदापूरचे अंतर अवघे सहा किमी आहे. या सैदापूरमध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत. पावकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी कराड आयटीआयचा रस्ता घ्यावा आणि सैदापूर गावात जावे. या गावाच्या कृष्णानदीच्या तीरावरच पावकेश्वर मंदिर आहे. कोल्हापूर-कराड अंतर 70 किमी आहे.
रहाणे-भोजन
राहण्यासाठी कराड शहरात अथवा विद्यानगर परिसरात लॉजेसची सोय आहे. प्रत्यक्ष सैदापूर गावात एकही हॉटेल नाही. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तू जवळ बाळगाव्यात.
भेट देण्यास सर्वोत्तम काळ
वर्षभर केव्हाही… पावसाळ्यात सर्वाधिक रमणीय…
आणखी काय पहाल?
- कराडमधील ऐतिहासिक मनोरे - 6 किमी
- कराडमधील नकट्या रावळाची विहीर - 6 किमी
- कृष्णा-कोयना नद्यांचा प्रितीसंगम - 6 किमी
- मसूर येथील समर्थस्थापित मारुती - 14 किमी
- तळबीड येथील हंबीरराव मोहिते स्मारक - 22 किमी