थंडीची लाट हळूहळू भारतात पसरू लागली आहे आणि थंडीमध्येच अनेक भाज्या आपल्याला उपलब्ध होतात. रोजच्या स्वयंपाकात वापरली जाणारी कोथिंबीर ही सुद्धा थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. भारतात या कोथिंबीर पासून अनेक पदार्थांना चव येते कारण तिचा सुगंध हा त्या पदार्थाला चविष्ट बनवतो.
कोथिंबीर ही अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे तिचा वापर आपल्या रोजच्या जेवणामध्ये होतो.
कोथिंबीर ही जीवनसत्व ए आणि सी च्या उत्तम स्त्रोत आहे.
कोथिंबीर आपली पचनशक्ती सुधारते. तसेच अनेक पोटांच्या तक्रारीत फायदेशीर ठरते.
या कोथिंबीर चा वापर आपण पदार्थाच्या सजावटीसाठी तर करतोच मात्र त्यापासून काही चविष्ट पदार्थही बनवले जातात जसे की सूप, वडी ,मुठिया इ.
पुण्यातील जोशी स्वीट्स येथील प्रसिद्ध कोथिंबीर वडी ही माझ्या आवडीची आहे खरोखरच अतिशय उत्तम रित्या ही कोथिंबीर वडी बनवली जाते.
ही कोथिंबीर वडी घरात देखील बनवली जाते आणि ती तितकीच खुसखुशीत आणि कुरकुरीत बनते. आज आपण कोथिंबीर वडी ची पद्धत पाहणार आहोत.
कोथिंबीर वडी:-
कोथिंबीर वडी बनवण्याकरिता सुरुवातीला ती छान स्वच्छ निवडून धुवून घ्यावी आणि त्यातले पाणी काढून घ्यावे त्यानंतर तिला बारीक चिरून घ्यावी.
त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट ,मीठ, गरम मसाला, तीळ, लसूण खोबरे वाटण ,थोड्याशा लिंबाचा रस, बेसन पीठ, तांदळाचे पीठ हे सर्व एकत्र करून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे.
त्याचे छान हाताला तेल लावून गोळे बनवावेत वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे.
त्यानंतर स्टीमर मध्ये ठेवून 15 मिनिटापर्यंत वाफवून घ्यावेत नंतर त्याला थंड करून घ्यावे आणि सुरीने त्याचे बारीक काप करून घ्यावेत.
हे काप तुम्ही कमी तेलातही परतू शकता किंवा जास्त तेलामध्ये तळू ही शकता.
मला तर ही कोथिंबीर वडी उकडलेली फार आवडते त्यामुळे मी तिची तळण्यापर्यंत वाट पाहत नाही उकडल्या उकडल्या माझा खायचा कार्यक्रम सुरू होतो.
कोथिंबीर पासून बनवलेला तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो आणि तुमच्या भागात कोणता प्रसिद्ध पदार्थ कोथिंबीर पासून मिळतो ते मला नक्की कळवा.