स्वयंचलित छाननीमध्ये काही आक्षेपार्ह सामग्री आढळल्यास पुनरावलोकने खासगी होतात. ती वस्तुस्थिती आता मला मॅप्स युझर काँट्रीब्युटेड कन्टेन्ट पॉलीसीज अगणित वेळा वाचल्यावर अति परिचित झाली आहे.
मी, माझी कोणतीही पुनरावलोकने खाजगी केली आहेत की नाही, हे महिन्यातून एकदा तरी सत्यापित करत असतो.
तसेच, आजकाल, मला मराठीत आढावा लिहायला आवडते.
त्याच वेळी, मी त्या लिखाणाचा इंग्रजी अनुवाद देखील तितकाच विश्वासू राहील याची खात्री करत असतो.
काहीसे त्रासदायक असले तरीही माझ्या हे लक्षात आले आहे की त्यामुळे पुनरावलोकने सुस्पष्ट होतात.
मागील महिन्यात असाच तपास करताना मला जाणवले की माझे एक पुनरावलोकन आता खाजगी झाले आहे.
अथक प्रयत्नांती ते पुन्हा सार्वजनिक झाले. तथापि, तसे करताना, मला खालील अनुभव आला.
मी त्या वर्णनात वापरलेली काही वाक्ये या प्रमाणे होती.
१. विक्रेत्यांनी त्यांचा माल रस्त्यांवर मांडला होता. त्यामुळे वाहतुकीस जागा उरली नव्हती.
२. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती, आणि आम्ही वाईट रित्या त्यात अडकलो.
३. खड्डे पडल्यामुळे रस्ता फारच खराब झाला होता.
४. रस्त्याच्या मधोमधच एक पाण्याची विहीर दिसू लागली.
पण दोन दिवसातच ते पुनरावलोकन खाजगी झाले.
मी, वर उल्लेख केलेली सर्व वाक्ये हटवून ते पुनरावलोकन संपादित केले.
पण काहीच उपयोग झाला नाही. चोवीस तास उलटून गेल्यानंतर देखील परिस्थिती तशीच राहिली.
त्यानंतर, मी ते पुनरावलोकन हटविले आणि एक नवीनच इतिवृत्तांत मराठीत तयार केला.
पण तरीही उपयोग झाला नाही. दोन दिवसांनंतरही ते खाजगीच राहिले.
मात्र या धडपडीत , पूर्वीच्या पुनरावलोकनासह असलेले फोटो माझ्या योगदानातून नाहीसे झाले.
त्यानंतर मात्र मी ते पुनरावलोकन इंग्रजीत रूपांतरित केले.
आणि आश्चर्य म्हणजे काय, ते पुनरावलोकन काही क्षणातच सार्वजनिक झाले.
तरीही मला काही अनपेक्षित बाबी जाणवल्या.
पुनरावलोकन पुन्हा सार्वजनिक झाले. पण तरीही, ते माझ्या प्रोफाइल पृष्ठावर दिसत नव्हते.
चोवीस तासांनंतर, ते माझ्या खाजगी प्रोफाइल पृष्ठावर दृश्यमान झाले.
असे असूनही, पुनरावलोकन अद्यापही माझ्या सार्वजनिक प्रोफाइल पृष्ठावर दिसत नाही. मात्र, कोणीतरी जर “सर्व पुनरावलोकने पहा ” या मेन्यू वर क्लिक केले, तर ते प्रथम दिसेल.
तथापि, मला ही एक क्षुल्लक बाब वाटते.
टीप:- हे केवळ माझ्या अनुभवाचे सादरीकरण आहे, आणि त्यामधून कोणताही निष्कर्ष काढण्याचा माझा हेतू नाही.