मागील लेखात मी नकाशे मध्ये भरीव कामगिरी करण्याचा राजमार्ग दाखवला.
अर्थात भाषांतर करतानाही काही अवधाने सांभाळावी लागतात. ती या प्रमाणे,
- ऱ्हस्व आणि दीर्घ.
एक तापदायक कलम.
पाणि आणि पाणी यात फरक आहे हे वेगळे सांगायला नकोच.
तरी सुध्दा या संबंधीचे नियम आता फारच सुटसुटीत झाले आहेत.
तसेच काही बाबतीत जीबोर्ड मध्येही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ हा “ऱ्हस्व” शब्द लिहितानाच मला चाचपडावे लागले. जीबोर्ड तो र्हस्व असेच सुचवीत होता. मला त्यासाठी कऱ्हा या शब्दापासून सुरवात करून त्यात सुधारणा करावी लागली.
2 विशेष नामाचे भाषांतर कधीही करू नये.
परंतु जे शब्द त्या संस्थेच्या कार्याचे वर्णन करतात त्याचे भाषांतर करण्यास काहीच हरकत नाही. तरीही यामध्ये मूळ इंग्रजी विशेष नाम आणि कार्य यात सुसंवाद असणे आवश्यक.
रेनबो स्वीट्स याचे रूपांतर रेनबो मिठाई? ते फारच विनोदी वाटेल.
अर्थात चितळे स्वीट्स याचे चितळे मिठाई किंवा मिष्टान्न हे रुपांतर अत्यंत सयुक्तिक.
यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ते ने मात्र अनेक ठिकाणी शब्दशः भाषांतर केल्याचे आढळले.
“वेलकम स्वीट्स” याचे रूपांतर "आपले स्वागत आहे गोड" आणि “कॅफे हेवन” चे रुपांतर “कॅफे स्वर्ग” मध्ये केल्याचे दिसले. हा तर अतिरेक झाला.
एकंदरीत नावाचे भाषांतर करताना तारतम्य बाळगणे आवश्यक
3 योग्य शब्द वापरणे गरजेचे. कार्टून आर्ट गॅलरी याचे रूपांतर व्यंगचित्र कला दालन असे करणे अत्यंत अयोग्य. व्यंग्यचित्र हाच योग्य पर्यायी शब्द आहे.
- अनेक वेळेस मूळ इंग्रजी नाव तसेच वर्गीकरण यातही चुका आढळतात. भाषांतरा बरोबर त्याही सुधारणे आवश्यक आहे. चुकीची माहिती तशीच का राहून द्यावी?
दुकानाचे नाव आहे बंगलोर अयंगार बकरी आणि हे केक्स विकतात. तेंव्हा बकरी चे स्पेलिंग बेकरी असे दुरुस्त करणे आवश्यक.
परंतु यामध्ये आपले संपादन स्वीकृत होण्याचा कालावधी मात्र वाढेल.
5 काही वेळेस मूळ नावामध्ये शहर किंवा गाव यांच्या नावाचाही उल्लेख असतो. मार्गदर्शक तत्वान्प्रमाणे ते अयोग्य आहे. परंतु येथे मात्र इंग्रजी नावास हात न लावता भाषांतरामध्ये तो उल्लेख वगळावा.
वरील सर्व मसुद्याचा इंग्रजी मजकूर मी गूगल भाषांतरात बघितला. परंतु त्यात फारच तोडमोड झालेली दिसली. तरीही हा लेख मराठी भाषांतराशी संबंधित असल्यामुळे याला दुसरा पर्याय नाही…
