रविवार असल्याकारणाने काल संध्याकाळचे जेवण बाहेर करायचे ठरले होते आणि त्या मुळे आम्ही कार्निवल हॉटेल कोल्हापूर येथे जेवण करायला गेलो होतो. कार्निवल हॉटेल हे तसे जुने हॉटेल आहे पण चार-पाच महिने रिनोवेशन साठी बंद होते आणि त्यानंतर आता पुन्हा नव्याने एक महिना झाले सुरू झाले आहे. या हॉटेलचे मालक आनंद काळे हे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत आणि अभिनयासोबतच ते आपलं कार्निवल हॉटेल अतिशय उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
यापूर्वी त्यांच्या हॉटेलमध्ये फक्त ग्राउंड फ्लोअर होता ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या हॉटेलची व्यवस्था केली होती मात्र आता रिनोवेशन नंतर त्यांनी आता आणखी दोन मजले वरती वाढवून त्यामध्ये प्रशस्त अशी बसण्याची सोय केली आहे. तसेच अगदी वरच्या मजल्यावरती त्यांनी पार्टी हॉल ही तयार केला आहे अजूनही काही काम बाकी आहेत.
ही माझी दुसऱ्यांदा त्यांच्याशी झालेली भेट होती. पहिल्या भेटीतच मला त्यांचा मनमोकळा स्वभाव कळाला होता आणि म्हणूनच काल झालेल्या भेटीत मी त्यांच्याशी गुगल मॅप आणि लोकल गाईड कनेक्ट या संबंधी बोलण्याचा प्रयत्न केला. लोकल गाईड या ठिकाणी कसे काम करतात हे देखील मी त्यांना सांगून दिले. लोकल गाईड रिव्ह्यू लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतात हे देखील मी त्यांना सांगितले. हॉटेल पाहताना लोक कोणत्या गोष्टी पाहतात हे देखील त्यांना सांगितले तसेच त्यांना व्हील चेअर असणाऱ्या लोकांकरीता काय केले पाहिजे हे देखील त्यांना सांगितले.
यामध्ये मी त्यांना लोक गुगल मॅप चा वापर करून हॉटेल कसे शोधतात आणि गुगल मॅप वरील रिव्ह्यू पाहून हॉटेल ना भेटी कसे देतात हे मी त्यांना सांगितले .तसेच हॉटेल शोधताना लोक काय काय गोष्टी शोधत असतात याबद्दलही मी त्यांना माहिती दिली त्यामध्ये प्रामुख्याने व्हील चेअर वाल्या लोकांसाठी कोणत्या सुविधा असाव्यात आणि त्या त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठीच्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या आणि त्यांना त्या खूप आवडल्या.
त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांनी काही टेबल्स हे प्राणी पाळणाऱ्या लोकांच्या कुटुंबांकरिता सुद्धा राखून ठेवलेले आहेत .म्हणजेच तुम्ही आता तुमचे पाळीव प्राणी घेऊन सुद्धा जेवण करायला जाऊ शकता आणि असे हॉटेल कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहे हे सांगताना त्यांना खूप आनंद झाला.
तसेच मला त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये व्हील चेअर वरून येणाऱ्या लोकांच्या गप्पा गोष्टीही सांगितल्या. अभिनेता असल्याकारणाने त्यांच्या हॉटेलमध्ये सिने क्षेत्रातील लोकांचाही वावर असतो त्यामुळे त्यांनी जेवणामध्ये आणखी व्हरायटी आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या येथील जेवणाचे कौतुक तर बरेच लोक करतातच पण लोकल कोल्हापूरकर सुद्धा त्यांच्या जेवणाच्या चवीचे कौतुक करतात. या हॉटेलमधील सर्व स्टाफ अतिशय वेल मॅनर आणि काळजी घेणारा आहे.
या हॉटेलला जाण्याकरिता तुम्हाला स्टॅन्ड वरून रिक्षा करून जाता येईल किंवा शेअरिंग रिक्षा सुद्धा मिळतात.
यांच्याकडे ड्राइव थ्रू ही सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरमध्ये खिमा मिसळ मिळण्याचे हे एकमेव ठिकाण आहे आणि तेही फक्त सकाळी बारा वाजेपर्यंत उपलब्ध असते. रिनोवेशन झाल्यानंतर आता ते खिमा मिसळ हे लवकरच संध्याकाळी सुद्धा सुरू करणार आहेत. या हॉटेलमध्ये तुम्हाला नवनवे फेस्टिवल सुद्धा आयोजित केलेले दिसून येतात ज्यामध्ये कधी कबाब फेस्टिवल कधी बिर्याणी फेस्टिवल असे आयोजित केले जातात. तेव्हा कोल्हापूरमध्ये आल्यानंतर या हॉटेलला नक्की भेट द्या.