नमस्कार…
माझ्या लोकल गाईड मंडळींनो…
भारतीय घरात अळूवडी बनवायची वेगवेगळी पद्धत आहे, मी माझी पद्धत तुमच्याबरोबर सामाईक करत आहे…
अळू वडी बनवायची अळुची पाने 5 (मध्यम आकाराची)
तीन वाट्या बेसन,
एक चमचा बरीक रवा,
आलं, मिरची, लसुन पेस्ट दोन चमचे,
चिंचेचा कोळ / पेस्ट चवीनुसार
गुळ चवीनुसार
( महत्त्वाची टीप- अळू हा खाजेरी प्रवर्गात मोडतो त्यामुळे यात जर योग्य प्रमाणात आंबटपणा नसेल तर घशाला खवखव होते व काही वेळेला खोकला ही लागतो जिभेला चुरचुरुन टोचायला लागते,
म्हणून आंबटपणा शिवाय आळू चा कोणताही खाद्य प्रकार आपण करू नये,
चिंच वापरायची नसेल तर लिंबू किंवा कोकम यापैकी कोणताही आंबट पदार्थ वापरावा परंतु चिंच व गुळ याचे कॉम्बिनेशन खूप चविष्ट लागते, अळू वडी हि चिंचगूळाशिवाय अळू चे पदार्थ करूच नये असे माझे मत आहे )
मीठ चवीनुसार.
वरील सर्व पदार्थ एकत्रित पणे एकजीव करून घ्यावे,
व ते आळूच्या पानाला मागच्या बाजूला लावावे,
लावताना आळुचे पान एक सरळ व एक उलटे (एक पानाचे टोक वरच्या बाजूला दुसऱ्या पानाचे टोक खालच्या बाजूला असे एकावर एक रचत जावे) लावत असताना त्याच्यावर ते बेसन मिश्रण समप्रमाणात पसरावे मग दुसरे पान रचावे त्याच्यावरही मिश्रण समप्रमाणात पसरावे
अशा प्रकारे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे सर्व ठिकाणी लावावे,
त्यानंतर दोन्ही बाजूला अळूच्या पानांची घडी करावी व वरच्या साईटने गोल / रोल करत यावे नंतर रोल वाफवून घ्यावा.
( वाफवण्याच्या पद्धती तीन )
१ - एका टोपामध्ये पाणी घेऊन वरती चाळणी मध्ये तो रोल ठेवावा व झाकण लावावे, मोठ्या आचेवर पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यावे,
अथवा
२ - कुकर मध्ये
थोड्याशा पाण्यामध्ये टोप ठेवावा किंवा वाडगे ठेवावे त्याच्यावर एका ताटामध्ये तो रोल ठेवावा कुकरचे झाकण लावावे त्याला सिटी लावू नये व पंधरा ते वीस मिनिटं त्या कुकरमध्ये रोल वाफवून घ्यावा.
किंवा
३ - मोदकाच्या भांड्यामध्ये तळाला पाणी ठेवावे वरच्या भांड्यामध्ये रोल ठेवून १५ २० मिनिटे झाकण लावून घ्यावे
टिप -
प्रत्येक पद्धतीत रोल वाफवायला ठेवताना पाण्यामध्ये आणि रोलमध्ये अशाप्रकारे अंतर असावे कि पाणी उकळताना रोल पर्यंत पाणी पोहोचले नाही पाहिजे,
रोल शिजला आहे की नाही हे कळण्यासाठी त्या रोल मध्ये सुरी घालून पहावे सूरीला जर आपण लावलेलं मिश्रण लागलं तर समजावे ते अजून शिजवायला हवे आहे,
व सुरी साफ निघाली कि समजावे रोल शिजला आहे.
नंतर तो रोल एक तास थंड होऊन द्यावे,
आळुच्या वड्या पाडण्यापूर्वी हा वापरलेला रोल फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी एक तास ठेवावा एक तासानंतर अळूच्या पानांचा रोल बाहेर काढावा,
थंड झाल्यानंतर त्याचे तुम्हाला हवे असलेल्या आकारांमध्ये जाड किंवा बारीक अशाप्रकारे कापून घ्यावा…
जास्त पातळ असल्यास अळूवडी लवकर तळली जाते व कुरकुरीत होते तुम्ही दोन-तीन प्रकारे करू शकता एक तर शॅलो फ्राय करावे म्हणजे थोड्याशा तेलात तळून घ्यावे, किंवा डिप फ्राय करावे म्हणजे भरपूर तेलात तळून घ्यावे,
नाही तर कॅलरी कॉन्शस असाल तर सर्व वड्या पसरवून त्यावर ऑप्शन म्हणून फक्त वर सफेद तिळाचे व कढिपत्त्याची फोडणी द्यावी…
अळूचे फदफदे व अळूवडी हे महाराष्ट्रातील तसेच कोकण विभागातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे पण या खाद्यपदार्थात जर चिंच व गुळ याचे योग्य प्रमाणात मिश्रण जमून आले तर या पदार्थाची गोष्टच न्यारी पण जर
योग्य प्रमाणात हे मिश्रण जमले नाही तर मात्र चवीत बराच फरक पडतो…
अळूवडी बद्दल
तुमचे अभिप्राय किंवा तुमची वेगळी पद्धत कळवावी…
मी केलेल्या आळुवडी ची रेसिपी वाचल्या बद्दल धन्यवाद…