कॅप्शन: बेडसे यथील लेण्यामधील प्रार्थना गृहाचे प्रवेशद्वार.
पुण्यावरून मुंबई कडे एक्स्प्रेसवे ने जाताना तळेगाव टोल बूथ ओलांडल्यावर आपल्याला समोर एक उंच डोंगर दिसतो.
त्यामध्ये जरा निरखून पाहिल्यावर दोन चौकोनी खिडक्या दिसतात.
एका ओबडधोबड डोंगरात इतक्या सुबक आखीव खिडक्या?
हा काय प्रकार आहे याचे मला बरेच दिवस कुतूहल होते.
बेडसे येथे गेल्यावर लक्षात आले की ते दुसरे तिसरे काही नसून येथील प्रसिद्ध लेणी आहेत.
पण एक्स्प्रेस वे वरून तिथे जाण्यासाठी निर्गमन नाही. त्यामुळे जुन्या मुंबई पुणे रस्त्यानेच प्रवास करावा लागतो. कामशेत येथे डावीकडे एक फाटा फुटतो. त्यानंतर एका छोट्या घाट रस्त्याने आणि पुढे एक्स्प्रेसवे खालून तुम्ही बेडसे गावात पोहोचता.
पुढचा रस्ता खडबडीत आहे पण थोडेच अंतर जावे लागते.
त्यानंतर पुढे हॉटेल कृष्णाई जवळ सार्वजनिक वाहनतळ आहे.
त्यानंतर पुढचे मार्गक्रमण मात्र तुम्हाला पायी करावे लागेल . थोडे अंतर चालून गेल्यावर चढाव दिसू लागतो.
पण चढावाच्या पायऱ्या मात्र उत्कृष्ट आहेत.
कॅप्शन: लेण्यांकडे जाण्याचा मार्ग.
अंदाजे चारशे पायऱ्या चढल्यावर लेणे दिसू लागते.
यात खूपच दमछाक होते. पण सभोवती बरीच झाडे असल्यामुळे फार त्रास होत नाही.
चढण संपल्यावर, समोरच एक उत्कृष्ट प्रार्थना गृह दिसते.
पण सध्या पुरातत्त्व विभागाने आत जाण्यास बंदी केली आहे.
आतमध्ये काही उल्लेखनीय शिल्पे आहेत असे समजले.
प्रवेशद्वारा वरील कमानीची शिल्पकला पाहून आपल्याला त्याचा अंदाज येतो. पण सध्या तेवढ्यावरच समाधान मानावे लागेल.
तसेच, येथे अजिंठ्याप्रमाणे चित्रकारीही होती. पण, दुर्दैवाने, ते मात्र आता नाहीसे झाले आहे.
कॅप्शन: लेण्यांची काही दृश्ये.
थोडे पुढे उजव्या-हाताला एक विहार आहे. बौद्ध भिक्कुंच्या राहण्याची व्यवस्था तिथे होत असे.
कॅप्शन: बेडसे येथील एक विहार.
आणि डाव्या-हाताला, एक छोटा स्तूपही आहे.
आणि वरून “पवनमावळ” चे दृश्यही रमणीय वाटते.
कॅप्शन: पायऱ्यांवरून दिसणारे मावळ भागाचे दृष्य.पुरातन कालातील कारागिरांनी अनेक अप्रतिम लेणी महाराष्ट्रात निर्माण केली आहेत.
अशीच काही सुंदर लेणी बघून तर सुप्रसिद्ध कवी केशवसुत यांना हे काव्य सुचले नसेल?
प्राप्त काल हा विशाल भूधर. सुंदर लेणी तयात खोदा।
निज नामे त्यावरती नोंदा. … … … |
दुर्दैवाने, या कलाकारांनी ना त्यांची, ना त्यांच्या प्रायोजकांची नावे येथे नोंदवली आहेत!
तर, मला आठवत असलेल्या काही उल्लेखनीय लेण्यांची यादी याप्रमाणे.-
लेण्याद्री परिसर - जुन्नर, पुणे
घारापुरी (किंवा एलीफंटा) - मुंबई
कृष्णगिरी (किंवा कान्हेरी) - मुंबई
“कार्ला” - पुणे
“भाजा” - पुणे
बेडसे - पुणे
अजिंठा - औरंगाबाद
वेरूळ - औरंगाबाद
औरंगाबाद लेणी - औरंगाबाद
पांडव लेणी - नाशिक
जमेल त्या प्रमाणे या सर्व स्थळांना एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी!